पोलादपूर (शैलेश पालकर)- तालुक्यातील आंबेनळी घाटातील रस्त्याचे रुंदीकरण सुरू असताना अनेक ठिकाणी डोंगर उभी कापल्याने दगडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलादपूर तालुक्यातील पायटा ते कुंभळवणे दरम्यान मंगळवारी रात्री दगड कोसळल्यानंतर गुरुवारी सकाळी पुन्हा दगड कोसळण्याची घटना बावळी टोक या ठिकाणी घडली.

तहसीलदार कपिल घोरपडे यांनी आवश्यक असल्यासच आंबे नाही घाटाचा वाहतुकीसाठी वापर करण्याचे आवाहन केले आहे. दरडी कोसळण्याचे सातत्य राहिल्यास घाटरस्ताबंदीची अधिसूचना गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही जारी होण्याचे संकेत मिळत आहेत.
जुलै 2021 मधील अतिवृष्टी काळात आंबेनळी घाट अनेक ठिकाणी दरडी कोसळून वाताहत झाल्यानंतर या रस्त्याच्या कायमस्वरूपी मजबूतीकरणासाठी महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या ताब्यात हा संपूर्ण आंबेनळी घाटरस्ता सोपविण्यात येऊन सातारा बाजूने या रस्त्याच्या कामास सुरूवात करण्यात आली.
पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर शहर, कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायतीअंतर्गत रानबाजिरे, काटेवाडी, सिध्दार्थनगर, भराववाडी, कापडे कमानीचा परिसर तसेच आड, चांभारगणी, कुंभळवणे, पायटे, दाभिळटोंक, बावळीटोक पर्यंतच्या या 24.200 कि.मी. रस्त्याचे रूंदीकरण सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी रस्त्याखालील मोऱ्यांसाठी खोदकाम करुन चौकोनी व गोलाकार काँक्रीटचे पाईप पुरुन कडेने काँक्रीटच्या मोऱ्याचे बांधकाम करण्यात आले.
पोलादपूर महाबळेश्वर रस्त्याच्या सुधारणेचे काम कंत्राटदार आरपीपी-एसआयपीएल (4) यांच्यामार्फत हाती घेण्यात आल्यापासून आंबेनळी घाटामध्ये 11 जुलै 2025 रोजी सुरू झालेली घाटरस्ताबंदीची अधिसूचना घाट सुरू होण्यापूर्वीच 15 जुलैपासून 15 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली होती. आताही एका दिवसाआड आंबेनळी घाटामध्ये दरडी कोसळण्याच्या सलग दोन घटनांनंतर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी या आंबेनळी घाटरस्त्यावरून वाहतूक करणाऱ्यांना दरडी कोसळण्याचे सातत्य लक्षात घेता वाहतुकदार आणि प्रवासी वाहनांनी आवश्यक वाटल्यास आंबेनळी घाटाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, प्रशासनाकडून हे आवाहन करण्यात आल्यानंतर सातत्याने दरडी कोसळण्याच्या घटना होत राहिल्यास गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील घाटरस्तावंदीची अधिसूचना जारी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.