चिपळूण : चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील रहिवासी तथा मुंबई पोलीस दलातील अधिकारी संजय सदाशिव सागवेकर यांची शासनाने डीवायएसपी (एसीपी) पदावर पदोन्नती केली असून, त्यांची व्हीआयपी सुरक्षा विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाबद्दल चिपळूण परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संजय सागवेकर यांचे प्राथमिक शिक्षण महानगरपालिका शाळेत, माध्यमिक शिक्षण युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण डी.बी.जे. महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील कीर्ती महाविद्यालय, दादर येथून बी.ए. पदवी संपादन केली. काही काळ विविध ठिकाणी खासगी नोकरी केल्यानंतर समाजसेवेची आवड आणि वडिलांचा पोलीस सेवेतला वारसा यामुळे त्यांनी पोलीस दलात प्रवेश केला.
पोलीस अधिकारी होण्याची जिद्द कायम ठेवत त्यांनी खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण केली. नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण करून सन २००१ मध्ये ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून मुंबई पोलीस दलात रुजू झाले.
मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असताना त्यांनी अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला. तसेच समाजातील दुर्बल, उपेक्षित नागरिक आणि महिलांना कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष कार्य केले. कोणताही गाजावाजा न करता कर्तव्यनिष्ठपणे सेवा बजावल्यामुळे त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक आणि उल्लेखनीय सेवेला शासनाने गौरवाची पावती देत त्यांची डीवायएसपी (एसीपी) पदावर पदोन्नती केली असून, व्हीआयपी सुरक्षा विभागात त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदोन्नतीबद्दल चिपळूण मित्रवर्गासह विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
