चिपळूण : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत रत्नागिरीच्या अभिषेक चव्हाणने दुहेरी मुकुट पटकावला.
या स्पर्धेत रत्नागिरी जिल्हातून सर्व गटातून सुमारे २५० स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात राष्ट्रीय खेळाडू रत्नागिरीच्या अभिषेक चव्हाण याने राष्ट्रीय खेळाडू देवरूखच्या राहुल भस्मे याच्यावर २३-०९, २५-०० अशा सरळ दोन सेटमध्ये मात करून २०२६-२७ या वर्षातील जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या रियाज अकबर अली व अभिषेक चव्हाण या जोडीने चिपळूणच्या अभिजित खेडेकर व दीपक वाटेकर या जोडीचा संघर्षपूर्ण सामन्यात ००-१६, ११-००, १३-१० असा पराभव करून पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. पुरुष वयस्कर गटात देवरूखच्या राहुल भस्मेने राष्ट्रीय खेळाडू संतोष जोगळेकर यांचा २५-०४, २५-०१, तर महिला एकेरी गटात आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा कदम हिने राजापूरच्या निधी सप्रे हिचा संघर्षपूर्ण सामन्यात २५-००, ०४-१९, १६-०० असा पराभव करून अनुक्रमे पुरुष वयस्कर व महिला गटाचे विजेतेपद पटकाविले.
