खेड : – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघनिहाय लोकसभा संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात या नियुक्त्यांची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तळे गावचे सुपुत्र अशोक सकपाळ यांची बीड लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अशोक सकपाळ यांनी राजकिय शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय असून, समाजातील विविध घटकांशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबरोबरच सामाजिक उपक्रम, राजकिय जनसंपर्क आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर बीड लोकसभा मतदारसंघाची महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याचे मानले जात आहे. तळे या ग्रामीण भागातून पुढे येत शैक्षणिक व सामाजिक राजकिय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अशोक सकपाळ यांच्यावर आता बीड लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक जबाबदारी आली आहे. पक्षाची भूमिका आणि विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासोबतच कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्याची महत्त्वाची भूमिका त्यांना पार पाडावी लागणार आहे.
अशोक सकपाळ यांच्या नियुक्तीबद्दल तळे तसेच खेड तालुक्यातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, नव्या जबाबदारीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.