लोटे : – ( ज्ञानेश्वर रोकडे ) खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहती नजीक असलेल्या सोनगाव गावातील ओढ्याला पांढरे शुभ्र दुधासारखे रसायन मिश्रित पाणी आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. परिणामी शेकडो ग्रामस्थ आक्रमक होऊन पीरलोटे येथील एमआयडीसीच्या सी संपावर धडकले. ही घटना मंगळवार दिनांक सात रोजी सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान घडली.
खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहत ही जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील ही एक नामवंत आणि मोठी औद्योगिक वसाहत आहे. या औद्योगिक वसाहती मधून सुमारे २५ ते ३० हजार लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळत आहे. शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल कराच्या स्वरूपात या वसाहती मधून मिळतो. असे असले तरीही या वसाहतीची दुसरी बाजू म्हणजे येथील अपघात, रोजगारामध्ये स्थानिकांवर होणारा अन्याय, वायु प्रदूषण, जल प्रदूषण आणि माती प्रदूषण यासारख्या अनेक प्रश्नांनी सुद्धा ही औद्योगिक वसाहत चर्चेत आहे. कारखान्यांमधील रासायनिक सांडपाण्याच्या प्रक्रियेसाठी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अस्तित्वात असून सुद्धा काही कारखानदार आपला खर्च वाचवण्यासाठी आपले रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदी नाल्यांमध्ये सोडतात असा आरोप येथील ग्रामस्थांकडून केला जात आहे.

असाच प्रकार मंगळवार दिनांक सात रोजी सकाळी आठ वाजता घडला आहे. औद्योगिक वसाहती मधील पिरलोटे परिसरातील सहा कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी सी संपात जमा केले जाते. आणि तेथून ते सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात प्रक्रिया करण्यासाठी नेले जाते. मात्र या सी संपातील चेंबर ओव्हरफ्लो होऊन दुधासारखे पांढरे रासायनिक सांडपाणी थेट सोनगावच्या ओढ्याला मिळाले संपूर्ण ओढा पांढरा शुभ्र दिसत होता जणू काही सोनगाव मध्ये दुधाची गंगा अवतरली आहे. यामुळे सोनगाव मधील शेती आणि नैसर्गिक जलस्रोत दूषित तर झालेच त्याचबरोबर हे पाणी थेट खाडीला जाऊन मिळाल्यामुळे किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांच्या उदरनिर्वाहाला सुद्धा यामुळे धोका पोहोचला आहे. हे सर्व पाहिल्यानंतर सोनगाव तसेच खाडी किनारच्या मच्छीमार बांधवांनी आक्रमक होत सी संपावर धडक दिली. एमआयडीसी आणि एम पी सी बी च्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून याची कल्पना देऊन ‘तात्काळ येथे हजर व्हा आणि वस्तुस्थिती पहा’ असे सांगितले. मात्र तब्बल दोन तासानंतर हे अधिकारी तिथे पोहोचले आणि त्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले.