लांजा:(गोविंद चव्हाण)मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड येथील लक्ष्मीबाग परिसरातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर झालेल्या दरड दुर्घटनेदरम्यान प्रशासनाला मदत करणाऱ्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा लांजा पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या केबिनवर शनिवारी ४ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळून दुर्दैवी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत ५० ते ५५ वर्षीय अनोळखी वेडसर व्यक्ती मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून मृत्युमुखी पडली होती. मुसळधार पाऊस, मोठ्या प्रमाणातील मातीचा ढिगारा आणि प्रतिकूल परिस्थिती अशा आव्हानांवर मात करत पोलीस, महसूल प्रशासन तसेच स्वयंसेवकांनी सुमारे साडेसात तास अथक मदतकार्य केले. चार जेसीबींच्या साहाय्याने पहाटे साडेचारच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले होते.
या कठीण मदतकार्यात मोलाची साथ देणाऱ्या व्यक्तींचा मंगळवारी ७ जुलै रोजी लांजा शहरातील संकल्प सिद्धी सभागृहात सन्मान करण्यात आला. यावेळी वाकेडचे सरपंच संदीप सावंत, पोलीस पाटील जयवंत जाधव, जिजाऊ शिक्षण व सामाजिक संस्थेचे लांजा तालुकाध्यक्ष योगेश पांचाळ, संस्थेचे रुग्णवाहिका चालक संदेश पडद, ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेडचे जेसीबी ऑपरेटर विकास राठोड व सचिन जाधव, पोकलॅन ऑपरेटर अमित खुशवा, लोडर ऑपरेटर राजू यादव, टिपर चालक सोनू महापौर तसेच लांजातील जेसीबी ऑपरेटर सलीम सुंबड, रियाज सुंबड, आसिम मुल्ला आणि आतालीम खान यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी या सर्वांच्या धाडसी व निस्वार्थ सेवाभावाचे कौतुक करत, संकटाच्या काळात प्रशासनाला दिलेल्या सहकार्यामुळे मदतकार्य अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पार पडल्याचे सांगितले. तसेच भविष्यातही अशाच सामाजिक बांधिलकीने कार्य करण्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत सर्वांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
