मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने आता काहीशी विश्रांती घेतली आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप दिसून येत असून ऊन-सावल्यांचा खेळ अनुभवायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे पाऊस आहे तर कुठे उघडीप असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळं काही काळ जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळालं. दरम्यान, उद्यापासून म्हणजे 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या पावसाचा जोर, उद्या शुक्रवार दि. 10 जुलै, एकादशी पासून मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात ओसरण्याची शक्यता जाणवते. आजच काही भागात वातावरणात उघडीप जाणवू लागली आहे. मुंबईसह कोकणात सुद्धा सध्याच्या पावसाची तीव्रता कमी होवून केवळ मध्यम पावसाची शक्यता असु शकते.
उर्वरित महाराष्ट्रात केवळ अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. शुक्रवार दि. 10 जुलै ते रविवार दि. 19 जुलैपर्यंतच्या संपूर्ण दहा दिवसात मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात काहीशी उघडीप मिळण्याची शक्यता जाणवते. आज पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथा परिसरात जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने या भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर गेल्या काही दिवसांपासून सक्रिय असलेला पावसाचा पट्टा आता पूर्वेकडे सरकत आहे. त्यामुळे आजपासून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पावसाचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी होईल. दुसरीकडे, विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वरूपाच्या पावसाच्या सरींसह विजांचा इशारा देण्यात आला असून या जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे.उर्वरित राज्यात मात्र हवामान तुलनेने कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
