मुंबई : पोलीस घरगडी आहेत असे म्हणत त्यांच्यावर टीका करणाऱ्या संजय राऊतांना एक सवाल आहे, ‘वाझे काय लादेन आहे का’, म्हणत उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटके ठेवून खंडणी वसूल करण्याचे प्रयत्न करणाऱ्या सचिन वाझेची पाठराखण स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती तेव्हा हा सचिन वाझे तुमचा घरगडी म्हणून काम करत होता का? पोलिसांचा अपमान करू नका. पोलिसांबद्दल असे बोलाल तर महाराष्ट्रातले पोलिस आणि जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही, अशी खरमरीत टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केली.
श्री. बन म्हणाले की, सध्या एकमेकांवर टीका करणारे शरद पवार गटाचे आमदार आणि संजय राऊत आणि हे एका विचारासाठी एकत्र आले नव्हते तर केवळ महाराष्ट्राचा विनाश करायचा हे त्यांचे एकमेव धोरण होते. त्यांच्यात ना कुठला अजेंडा आहे ना कुठली एकवाक्यता. एकमेकांना शिव्या घालणे आणि टीकाटिप्पणी करणे इतकेच काम महाविकास आघाडीच्या नेत्यांना उरले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही महाविकास नाहीतर महाविनाश आघाडी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
जनाब संजय राऊत सांगताहेत की नांदेडमध्ये पूल कोसळला. नांदेडमध्ये पूल नाही तर एक छोटीशी भिंत कोसळली आणि तीही तातडीने दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले. कामात कोणता गैरव्यवहार झाला असेल तर निश्चितपणे चौकशी करून कारवाई केली जाईल. पण तुमच्यासारखे कंत्राटदार, महापालिकेकडून कमिशनखोरी करत मातोश्री 2 बांधणारे नेते आमच्याकडे नाहीत. कट, कमिशन, खंडणी हे तुमचे धंदे आहेत आणि महाराष्ट्राने कोविडच्या काळात ते पाहिले आहे. मुंबईचे वाटोळे केले त्यांनी विकासकामाबद्दल न बोललेलेच बरे, असे श्री. बन यांनी सुनावले.