श्रीवर्धन : श्रीवर्धनमध्ये उच्चदाब लाईन कामात बेजबाबदारपणा; नियमांना तिलांजली, नागरिकांच्या जिवाशी खेळ!’ अशा स्पष्ट मथळ्याखाली ‘वृत्त अनेक नामांकित वृत्तपत्रांनी या गंभीर समस्येवर सविस्तर वृत्त प्रसारित केले होते. कंत्राटदाराने नियम धाब्यावर बसवून अत्यंत कमी खोलीवर या हाय व्होल्टेज अंडरग्राउंड केबल्स टाकल्याचं उघड झालं होतं.
पण सर्वात मोठी आणि संतापजनक गोष्ट काय असेल, तर अनेक वृत्तपत्रांमध्ये वारंवार बातम्या प्रसिद्ध होऊनही, महावितरणच्या मुजोर प्रशासनाने याकडे सोयीस्करपणे कानाडोळा केला आहे! होय, या अंधाधुंद कारभारावर प्रसारमाध्यमांनी वारंवार कोरडे ओढले, पण अधिकाऱ्यांचे डोळे उघडले नाहीत. बातम्या आल्यानंतर केवळ दाखवण्यापुरतं, महावितरणने या उघड्या पडलेल्या वाहिनीवर वरचेवर खडी माती टाकून काम दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण पहिल्याच पावसात ही माती आणि खडी वाहून गेली आणि महावितरणचे ‘पाप’ पुन्हा एकदा रस्त्यावर उघडं पडलं!
सध्या कुरवडे येथील मुख्य रस्त्याची साईडपट्टी पूर्णपणे खचली आहे आणि महावितरणची ही जीवघेणी अंडरग्राउंड केबल थेट रस्त्याच्या कडेला उघड्यावर पडली आहे. रात्रीच्या वेळी या मुख्य रस्त्यावरून प्रवास करताना समोरच्या वाहनाचा प्रखर प्रकाश डोळ्यांवर पडला, आणि चालकाने गाडी किंचित जरी बाजूला घेतली, तर थेट या हाय व्होल्टेज वाहिनीवर गाडी जाऊन मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिक आता संतप्त सवाल विचारत आहेत की, “महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एखाद्या मोठ्या अपघाताची आणि निष्पाप नागरिकाच्या बळीची वाट पाहतंय का?” वृत्तपत्रांनी दिलेल्या इशाऱ्याकडे कानाडोळा करणाऱ्या या मुजोर प्रशासनाला कधी जाग येणार?
आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना आव्हान देतो की, तात्काळ कुरवडे येथील या रस्त्याची आणि भूमिगत वाहिनीची दुरुस्ती करण्यात यावी. अन्यथा, जर येथे कोणताही अपघात झाला, तर त्याला सर्वस्वी महावितरण आणि संबंधित कंत्राटदार जबाबदार असेल!