खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील वर्दळीच्या भरणे नाका परिसरात विद्यार्थिनींची छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना २७ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११ ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील बसथांब्यावर काही विद्यार्थिनी एसटी बसची प्रतीक्षा करीत होत्या. त्याचवेळी एका मद्यधुंद व्यक्तीने विद्यार्थिनींची छेडछाड केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे विद्यार्थिनींनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील जागरूक नागरिक आणि तरुण तातडीने घटनास्थळी धावून आले. याच परिसरातील शाळेत शिकणाऱ्या काही विद्यार्थिनींनी संबंधित व्यक्तीला पकडले. त्यानंतर नागरिक आणि विद्यार्थिनींनी त्याला थेट खेड पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात पोलिसांकडून कारवाईची प्रक्रिया सुरू होती. वर्दळीच्या सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थिनींची छेडछाड झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, भरणे नाका परिसरात विद्यार्थिनी, महिला तसेच नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी या परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवावी, सीसीटीव्ही यंत्रणा अधिक प्रभावी करावी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
