मंडणगड – मंडणगड आगाराचे माध्यमातून शहरातील बसस्थानकाचे परिसरात होणाऱ्या अनधिकृत पार्किगचे विरोधात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या धडक कारवाईच्या मोहीमेमुळे तालुकावासीयांची मोठी अडचण झालेली दिसून येत आहे. मंडणगड शहरात तालुक्याचे ग्रामिण भागातुन विविध कारणांसाठी येणाऱ्या नागरीकांना आपल्या गाड्या उभ्या करण्यासाठी शहरात कोठेही अधिकृत वाहनतळ नसल्याने शासकीय धान्य गोदामाचा परिसर, बसस्थानकाचा परिसर व काही खाजगी व्यापारी संकुलाच्या परिसरात विविध कामानिमीत्त येणारी नागरीक आपल्या गाड्या उभ्या करतात.

मंडणगड बसस्थानकाचे परिसरात वर्षानुवर्षे अशाच पध्दतीने मोकळ्या जागेत गाड्यांचे पार्कीग होत आले आहे. बसस्थानकाचे परिसरात प्रामुख्याने नगरपंचायत संकुल, शेट्ये, गोवळे, लेंडे कॉम्पलेक्स इत्यादी इमारतीमधील कार्यालयांच्या गाड्या उभ्या केल्या जातात मंडणगड आगाराने यापुर्वी कधीही अशा पध्दतीने या पार्कीगचे विरोधात कोणतीही धडक कारवाई केलेली नाही अथवा कोणीही गाड्या पार्कीग करु नये म्हणून परिसरात सुरक्षा रक्षक ठेवलेला नाही. सध्या बसस्थानकाचे परिसरात पार्कीग बंदीचा बँनर लावण्यात आला आहे.याचबरोबर बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक वेळोवेळी ध्वनीक्षेपकावरुन आवारातील गाड्या तातडीने हटवण्याच्या वेळोवेळी सुचना देताना दिसून आले आहेत. बसस्थानकाचे परिसरात पार्क करण्यात आल्या गाड्या परत बाहेर काढण्यासाठी आल्यावर आगाराचे कर्मचाऱ्यांनी गाड्यांच्या चाव्या काढण्याचे काही घटनांची चर्चा बाजारात सुरु आहे. मंडणगड बसस्थानकाचे नवीन इमारतीचे निमीत्ताने या परिसरात अनेक फेरबदल नव्याने होताना दिसून येत असल्याने आगाराने नवा नियम प्रभावीपणे राबविण्याचे मनावर घेतलेले दिसून येत आहे. मात्र बसस्थानकाचे स्वच्छता गृहाचे परिसरात उभ्या करण्यात आलेल्या खाजगी गाड्यांचे विरोधात कोणतीही कार्यवाही झालेली दिसून आलेली नाही. आगाराच्या नव्या नियमांमुळे तालुक्याचे ग्रामिण भागातून येणाऱ्या नागरीकांची गाडी पार्क करण्याची मोठी गैरसोय झाली आहे. मंडणगड आगारास पार्कीग बंदीचे उशीराने सुचलेले शहाणपण नागरीकांच्या चिंतेचा विषय बनले आहे.