मुंबई : मध्य प्रदेशात व्यापम नोकर भरती घोटाळा झाला होता परंतु आपल्याकडील एमपीएससी (MPSC) नोकर भरतीचा घोटाळा व्यापमपेक्षा मोठा आहे. एमपीएससीची सर्व व्यवस्थाच भ्रष्ट झाली असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरु असेलला खेळ थांबला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालून तातडीने ऑनलाईन परीक्षा व Normalization रद्द करावे, अन्यथा राज्यभर आंदोलन करू, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

MPSC च्या CBT व Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन बेलापूर येथे तीन दिवसापासून सुरु असून आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा दळवी, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रमुख धनंजय शिंदे, प्रदेश सरचिटणीस व नवी मुंबईच्या प्रभारी गुरुचरण बच्छर, प्रवक्ते सय्यद नासीर हुसेन, संतोष शेट्टी, प्रदेश सचिव आनंद सिंग आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भाजपा महायुतीचे सरकार मुकं, बहिरं व आंधळं आहे, यांच्याशी चर्चा कशी करावी हाच प्रश्न आहे. या सरकारला एक परिक्षाही व्यवस्थित घेता येत नाही. नीटचा पेपर फुटला पण तो काही आताच नाही तर आतापर्यंत ७७ वेळा फुटला. सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे. एमपीएससीच्या परिक्षेचे कंत्राट खाजगी कंपनीला देऊन त्या ऑनलाईन घेतल्या जात आहेत, त्याला विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध आहे. काँग्रेस पक्षाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आंदोलन सुरु केले असून हे आंदोलन राज्यभर होत आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही. तातडीने मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलनाचा हा वणवा राज्यभर पेटेल, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.