ठाणे – मुरबाड : ज्यांनी स्वतः च्या कष्टाने… त्यागाने आणि संस्कारांनी आपल्या मुलामुलींना घडविले… त्यांना शिक्षण दिलं… संघर्ष करण्याची ताकद दिली आणि समाजात कर्तृत्व सिद्ध करण्याची प्रेरणा दिली… प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्याच्या पाठीशी तिच्या आईचे संस्कार… तिची प्रार्थना आणि तिचे अथक कष्ट उभे असतात… अशा प्रत्येक मातेला आजच्या आई महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी वंदन केले.
दरम्यान मातांचा सन्मान करणाऱ्या प्रमोद हिंदूराव यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आई महोत्सवात आभार मानले.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ‘आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!.. आई खरंच काय असते? हा सर्वांना पडलेला प्रश्न असतो पण… आई म्हणजे लेकराची माय असते… वासराची गाय असते… धरणीची ठाय असते… आई असते जन्माची शिदोरी… सरतही नाही, उरतही नाही…’ ही कविवर्य फ. मु. शिंदे यांच्या कवितेच्या ओळी ऐकवून दाखवल्या…
एखाद्या व्यक्तीच्या यशामागे अनेकांचा वाटा असतो पण त्या यशाचा सर्वात मोठा पाया जर कोणी रचत असेल तर ती म्हणजे आई… आपल्या मुलांच्या भविष्यासाठी स्वतः च्या सुख-दुःखाचा विचार न करता आयुष्यभर झटणाऱ्या अशा मातृशक्तीचा गौरव करणं ही केवळ औपचारिकता नसून समाजाचं कर्तव्य आहे असेही सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या.
आज ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होत आहे. त्यांच्या यशामागे त्यांच्या अथक परिश्रमाबरोबरच आईवडिलांचे संस्कार… शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचा त्याग आहे. विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणजे भविष्यातील महाराष्ट्राचा सन्मान आहे असेही सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.
