पोलादपूर (शैलेश पालकर)- पंचायत समितीचे सभापती अविनाश शिंदे यांनी पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक पाहाणी भेट दिल्यानंतर तेथील डॉक्टरांसह कर्मचारी हजर नसल्याच्या घटनेची चर्चा तालुक्यात सर्वत्र सुरू झाली असताना धामणदिवी सरपंच क्षमता राजेश बांद्रे यांनी पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्र महामार्ग कातळी भोगावच्या भुयारी मार्गातून गेल्यानंतर कशेडी बंगला येथे जाणारा जुन्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील डेंजर झोन मुळे पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्र दूर्गम झाल्याने महामार्गालगत असलेल्या धामणदिवीतील आरोग्य उपकेंद्राला आरोग्य केंद्राचा दर्जा देण्याची मागणी केली आहे.
पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाशेजारी असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र तत्कालीन ग्रामविकास मंत्री प्रभाकर मोरे यांच्या पाठपुराव्याने पळचिल गावामध्ये स्थलांतरित करण्यात आले. तेथे कोणत्याही प्रकारची इमारत उपलब्ध नसल्याने प्राथमिक शाळेच्या इमारतीतील दोन खोल्यांमध्ये हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले.
हे प्राथमिक आरोग्य केंद्र मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात कशेडी बंगला येथून आत जाणाऱ्या रस्त्यालगत सुरू होते.
नवीन इमारतीमध्ये तब्बल 21 वर्षांनंतर आरोग्यसेवा सुरू झाली. भूमिपूजन तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर तब्बल 12 वर्षांनी त्यांच्या कन्या अदिती तटकरे या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री झाल्यानंतर 22 जानेवारी 2021 रोजी त्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यानंतर केवळ दोनच वर्षांनी मुंबई गोवा महामार्गावरील धामणदिवी आरोग्य उपकेंद्रापासून ५०० मीटर्स अंतरावरील पळचिलकडे जाणाऱ्या कशेडी घाटरस्त्याचा वापर बंद होऊन कातळी भोगाव येथील भुयारी मार्गाचा वापर सुरू झाला.
त्यामुळे सभापती अविनाश शिंदे यांनी पाहणी भेट देऊन डॉक्टरसह कर्मचारी हजर नसल्याच्या केलेल्या चर्चेपेक्षा परिसरातील रुग्णांना पळचिल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचता येण्याची सहजता नष्ट झाली असल्याने धामणदिवी येथील आरोग्य उपकेंद्राला आरोग्य केंद्राचा दर्जा देऊन दूर्गम झाल्याने पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्राला उपकेंद्राचा दर्जा देण्यात यावा, ही धामणदिवीच्या सरपंच क्षमता राजेश बांद्रे यांची मागणी योग्य ठरत आहे.