मुंबई : संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये रंगल्या होत्या. मात्र, या सर्व चर्चा केवळ सूत्रांच्या आधारे असून, पक्षाने अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की, अधिकृतपणे कुठलंही स्टेटमेंट आमच्या पक्षाने केलेले नाही. मात्र, याबाबतच्या वृत्तामुळे गैरसमज निर्माण झाले. त्यामुळे आता मी आदरणीय शरद पवार साहेब, माननीय जयंतराव पाटील, माननीय प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमच्या पक्षांच्या आमदार आणि खासदारांशी बोलून तुमच्यासमोर स्पष्टीकरण देण्यासाठी बसले आहे. जेणेकरून महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये, असे सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, मी याबाबत आज सकाळीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील आणि संजय राऊत या तिघांशीही बोलले आहे. एकतर मतदारसंघ पुनर्रचना विधेकयकाबाबत आमच्याकडे कोणतंही लेखी प्रस्ताव आलेले नाही. त्यामुळे आम्ही त्याबाबत बोलू शकत नाही. पण तसा प्रस्ताव आला तर आम्ही २४ तासांत भूमिका मांडू,असेही सुप्रियाताई सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.