चिपळूण (विशेष प्रतिनिधी) : जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजप नेते ॲड आशिष शेलार यांनी आज अनपेक्षित पणे ठाकरे गटाचे नेते आमदार भास्करशेठ जाधव यांच्या संपर्क कार्यालयात भेट दिल्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करण्यासाठी मंत्री शेलार आज चिपळूणमध्ये आले होते. मेळावा आटोपून पाग येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयाला त्यांनी भेट दिली. याच भागात आमदार जाधव यांचेही संपर्क कार्यालय आहे.
राज्यातील कोणीही मंत्री चिपळूणमध्ये आल्यावर आमदार जाधव व त्यांचे कार्यकर्ते स्वागत सत्कार करतात. हीच प्रथा म्हणून आमदार जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी मंत्री शेलार यांचा सत्कार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुमचे कार्यालय शेजारीच आहे मी तिथेच येतो आणि स्वागत स्वीकारतो असे म्हणून मंत्री शेलार आमदार जाधव यांच्या कार्यालयात दाखल झाले.त्या ठिकाणी तालुकाप्रमुख सुभाष जाधव, नगरसेवक फैसल कास्कर, विकी नरळकर आदी कार्यकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी मंत्री शेलार यांचे शाल बुके देऊन स्वागत केले. आमदार जाधव यावेळी मात्र उपस्थित नव्हते. भाजपचे आमदार प्रमोद जठार व भाजपाचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.