जळगाव:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी दिया मिर्झाच्या व्हिडिओवरून सुरू असलेल्या वादात उडी घेतली आहे. त्या म्हणाल्या की, फक्त सणांच्या तोंडावर असे वाद उकरून काढायचे आणि आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवायचे हाच काहींचा अजेंडा असतो

मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणावर उपाययोजना करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) लोकांना फटाके टाळून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं होतं. हा संदेश पसरवण्यासाठी, बीएमसीनं बॉलिवूड आणि क्रिकेटमधील अनेक प्रमुख व्यक्तींची मदत घेतली. दिया मिर्झा, माधुरी दीक्षित आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांसारख्या कलाकारांनी लोकांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन करणारे व्हिडिओ बनवले. मात्र, जेव्हा मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिया मिर्झाच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, तेव्हा या प्रकरणाला वेगळं वळण लागलं.

या वादावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही नाही, फक्त सणांच्या तोंडावर असे वाद उकरून काढायचे आणि आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवायचे हाच काहींचा अजेंडा असतो. देशातील लोकांना याकडे दुर्लक्ष करा आणि जोरदार दिवाळी साजरी करा असं त्या म्हणाल्या.

ध्रुवीकरणाच्या राजकारणावर शेरोशायरीच्या माध्यमातून टीका

रोहिणी खडसे यांनी शेर वापरत ध्रुवीकरणाचे राजकारण करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या की, नफरतों का असर देखो, जानवरों का बटवारा हो गया, गाय हिंदू और बकरा मुसलमान हो गया। हा शेर ध्रुवीकरणाचे राजकारण करत आहेत त्यांच्यासाठी हा शेर अगदी तंतोतंत लागू पडतो.