मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान संपल्यानंतर तब्बल ७६ लाख मतदान झाल्याचा मुद्दा समोर आला असून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती डॉ. प्रकला प्रभाकर यांनी आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत रात्री ९ ते २ वाजेपर्यंत मतदान झाले आणि तो निकालही फ्रॉड असल्याचे म्हटल्याने परिस्थिती गंभीर असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

आसाममध्ये काँग्रेस, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, तामिळनाडूमध्ये स्टॅलिन आणि विजय, तसेच केरळमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये जे घडले, तेच जर या राज्यांत पुन्हा घडले, तर संभाव्य निकाल पुढीलप्रमाणे लागू शकतात, असा दावा त्यांनी केला आहे.

तामिळनाडूमध्ये एकूण २३४ जागांपैकी AIADMK १५० जागा, भाजप २५ जागा आणि उर्वरित जागा स्टॅलिन, काँग्रेस आणि टीव्हीके पक्षांकडे जाऊ शकतात. केरळमध्ये किमान १५ जागा भाजप जिंकू शकतो. आसाममध्ये १२६ जागांपैकी भाजप ९० ते ९२ जागा जिंकू शकतो. पश्चिम बंगालमध्ये २९४ जागांपैकी भाजप १८० ते २०० जागा जिंकू शकतो. पुदुच्चेरीमध्ये १० जागा भाजप आणि १० जागा त्यांच्या मित्र पक्षांकडे जाऊ शकतात.

हे निकाल फेरफार करून आणले जाऊ शकतात, असा गंभीर आरोप करत आंबेडकर यांनी सर्व विरोधी पक्षांनी तत्काळ दक्षता घ्यावी, तसेच सर्व निवडणूक रिटर्निंग ऑफिसरना तंबी द्यावी, असे सांगितले. कायद्यानुसार काम केले नाही तर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. विरोधी पक्ष ही जबाबदारी पार पाडतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.