पेण (प्रशांत पोतदार) : कोप्रोली ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी मंगळवारी, ७ एप्रिल रोजी आपल्या मागण्यांसाठी प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून पाणी व इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी अधिकारी वर्गाचे लक्ष वेधले.
कमी दाबाने आणि कमी वेळ होणारा पाणीपुरवठा सुधारणे, अनधिकृत कनेक्शन तोडणे, उंबर्डे तरणखोप ते उंबर्डे फाटावरील अनधिकृत गतिरोधक काढणे आदी मागण्यांसाठी प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या नंदाताई म्हात्रे यांनी आंदोलनकर्त्या ग्रामस्थांची भेट घेऊन अधिकाऱ्यांसमोर पाणीप्रश्न सुटण्यासाठी बाजू मांडत आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले.
प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी प्रवीण पवार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी सेफाली देशमुख व कोप्रोलीचे सरपंच प्रवीण पाटील, सदस्य, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्या नंदाताई म्हात्रे यांच्या समवेत झालेल्या चर्चेनंतर आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची पूर्तता व उपाययोजना ५ दिवसांत करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी सेफाली देशमुख यांनी आश्वासन दिल्यानंतर तसेच लेखी पत्र दिल्यानंतर प्रांत कार्यालयासमोर करण्यात आलेले ठिय्या आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असल्याचे सरपंच प्रवीण पाटील यांनी सांगितले. तसेच मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास याहून अधिक तीव्र आंदोलन ग्रामस्थ करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.