लोटे :- मुंबई गोवा महामार्गावर लोटे माळ येथील महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या सर्विस रोडला बेकायदेशीर पार्किंगचे ग्रहण लागले असून अपघातांचा धोका वाढला आहे. सर्विस रोड हा दुतर्फा वाहतुकीसाठी वाहन चालकांना सोयीचे व्हावे याकरिता बनवलेला असतो. मात्र बेकायदेशीर आणि धोकादायक रित्या मोठमोठी वाहने येथे पार्किंग केल्यामुळे या सर्विस रोडवर इतर वाहनांना ये जा करण्यासाठी जागाच शिल्लक उरत नाही.परिणामी येथे अपघातांचा धोका वाढला आहे.
महामार्गावरील लोटे माळ येथे जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे. यामुळे या परिसरात प्रचंड रहदारी असते. महामार्ग प्राधिकरणाने ही बाब लक्षात घेऊन महामार्गाच्या पूर्वेला आणि पश्चिमेला सर्विस रोड उपलब्ध करून दिले आहेत. मात्र या सर्विस रोडवर दिवसभर आणि रात्रभर मोठ मोठी वाहने बेकायदेशीर रित्या पार्किंग केलेली असतात. मुळातच इथला सर्विस रोड गरजेपेक्षा खूपच अरुंद आहे आणि त्यातच हे असे धोकादायक पार्किंग केलेले असते. त्यामुळे सर्विस रोडवर वाहनांना येजा करण्यासाठी जागाच शिल्लक राहत नाही. अशावेळी वाहन चालक मार्ग काढताना मुख्य महामार्गावर जातात आणि यामुळे मोठी दुर्घटना घडून जीवितहानी सुद्धा होऊ शकते. तरीही महामार्ग प्राधिकरण अथवा महामार्ग पोलीस यांचे इकडे लक्ष कसे जात नाही ? असा प्रश्न पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह वाहन चालक यांना पडला आहे. असे बेकायदेशीर आणि धोकादायक पार्किंग करणाऱ्या व अपघातांस आमंत्रण देणाऱ्या वाहनांवर आणि त्या मालकांवर संबंधित यंत्रणांनी कठोर कारवाई करून संभाव्य अपघात टाळावेत अशी मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे.