चिपळूण : देशभरात नीट, टीईटीसह विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधार्थ तसेच या प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्याच्या मागणीसाठी चिपळूणमध्ये आज सोमवार 20 जुलै रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, सामाजिक संघटना आणि जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आवाहनानुसार, देशातील परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे या मागण्यांसाठी उपोषण करणारे पर्यावरणप्रेमी, शिक्षणप्रेमी, संशोधक आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केल्याच्या घटनेचाही निषेध करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर आज चिपळूणमध्ये सकाळी 10.30 वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर सर्वांनी एकत्र जमून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे हित, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि पेपरफुटीच्या घटनांवर कठोर कारवाई व्हावी, या मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात चिपळूण तालुक्यातील सर्व विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी 9011512929, 7350431111, 9423047620 या नंबरवर संपर्क करावा.