चिपळूण : स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यात वृक्षारोपणाचा महाअभियान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत जिल्ह्यात १०,००० झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी दिली. चिपळूण येथून वृक्ष लागवडीस सुरुवात करण्यात आली.
या उपक्रमाबत बोलताना शेकासन म्हणाले, “स्व. अजितदादा पवार हे शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यां साठी सदैव कार्यरत होते. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्या साठी पर्यावरण रक्षण हे देखील तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळेच त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून आम्ही हा वृक्षारोपण उपक्रम हाती घेतला आहे.”
.
ते पुढे म्हणाले, “रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, शाळा, सार्वजनिक ठिकाणे, मंदिरे, स्मशानभूमी आणि रस्त्याच्या कडेला हे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. फळझाडे, सावलीची झाडे आणि औषधी वनस्पतींना यात प्राधान्य देण्यात येईल. स्थानिक नागरिक, युवक आणि पक्षाचे पदाधिकारी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.”
जिल्ह्यात पर्यावरणीय समतोल राखणे आणि पुढील पिढीसाठी हिरवे रत्नागिरी घडविणे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचेही शेकासन यांनी सांगितले. या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
चिपळूण येथील महाराष्ट्र उर्दू हायस्कुलच्या आवारात स्व. अजितदादा पवार जयंती निमित्त जनसेवा साप्ताहला वृक्ष रोपणाने प्रारंभ करण्यात आला. यावेळी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी चिपळूण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हसन वांगडे, कार्याध्यक्ष अब्दुल रऊफ वांगडे, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन, चिपळूण एज्युकेशन सोसायटीचे उपकार्याध्यक्ष शब्बीर राजिवटे, खजिनदार आशिक हमदुले, कॉलेज कमिटी चेअरमन रेहाना बिजले, नगरसेविका शहनाज वांगडे, प्रायमरी स्कूल कमिटी चेअरमन व नगरसेविका नसरीन खडस, माजी चेअरमन व विद्यमान सदस्य करामत मिठागरी, पुअर बॉईज कमिटी चेअरमन महमद फकीर, संचालक नजीर काळोखे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष इमाम शाह, वहाब सुर्वे, नूरभाई बिजले, सलीम पालोजी, जिल्हा सरचिटणीस जमालुद्दीन बंदरकर, सामाजिक कार्यकर्ते खालिद दाभोळकर, नजीर वांगडे, संगमेश्वर युवा अध्यक्ष साहिल कापडी, इन्चार्ज मुख्याध्यापिका फहमीदा कादरी, वांगडे प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका शमीम मुल्लाजी शिक्षक वर्ग , शिक्षकेतर वर्ग , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस जमालुद्दीन बंदरकर यांनी केले.
