चिपळूण : रोटरॅक्ट क्लब चिपळूणच्या २०२६-२७ या वर्षासाठी अध्यक्षपदी सिद्धेश नितीन जाधव, तर सचिवपदी मृणाल करंजकर यांची नियुक्ती करण्यात आली. नव्या कार्यकारिणीच्या पदग्रहण समारंभात रोटरी क्लबचे इन्स्टॉलिंग ऑफिसर विक्रमसिंह कदम, असिस्टंट गव्हर्नर बिपिनचंद्र गांधी, रोटरी क्लब चिपळूणचे अध्यक्ष शैलेश टाकळे, सचिव रोहन देवकर, खजिनदार मंगेश गोंधळेकर यांच्यासह रोटरी परिवारातील सदस्य, कुटुंबीय आणि रोटरॅक्ट क्लबचे सदस्य उपस्थित होते.

नवनियुक्त अध्यक्ष सिद्धेश जाधव हे फार्मासिस्ट असून त्यांनी बी.एस्सी. केमिस्ट्री तसेच बी.एस्सी. हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. ते खेर्डी येथील एजिस मल्टी स्पेशालिटी क्लिनिकचे संचालक आहेत. सचिव मृणाल करंजकर हेही फार्मासिस्ट असून ते गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच पेटमाप येथे ते संजीवनी मेडिकलचे संचालन करतात.

पदग्रहणानंतर अध्यक्ष सिद्धेश जाधव यांनी आपल्या कार्यकाळातील पहिल्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा करत संपूर्ण चिपळूण तालुक्यासाठी ‘आरोग्य संजीवनी योजना’ सुरू करण्यात येत असल्याचे जाहीर केले. आर्थिक अडचण किंवा वेळेअभावी कोणताही नागरिक उपचारापासून वंचित राहू नये, या उद्देशाने ही योजना वर्षभर मोफत राबविण्यात येणार असून क्लबचे स्वयंसेवक गावोगावी जाऊन घरोघरी आरोग्य कार्डचे वितरण करणार आहेत.

या योजनेअंतर्गत डॉक्टरांचा सल्ला, दंत तपासणी, आहारतज्ज्ञांचे मार्गदर्शन, फिजिओथेरपी तसेच रक्तदाब, रक्तातील साखर आणि ईसीजी (ECG) तपासणी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय आठवड्यातून एक दिवस विविध गावांमध्ये मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

रोटरॅक्ट क्लबच्या नव्या कार्यकारिणीचे तसेच ‘आरोग्य संजीवनी योजना’ या सामाजिक उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.