रुखी : भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता ओळखून त्यावर आधीच उपाययोजना करण्याच्या उदात्त हेतूने व पंचायत समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रुखी येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेत.’एक दिवस गावासाठी’ या संकल्पनेतून एकत्र येत,संपूर्ण ग्रामस्थांच्या अभूतपूर्व श्रमदानातून एकाच दिवशी तब्बल १२ बंधारे बांधून पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे.
उन्हाळ्यात गावामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष भासू नये आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी रुखी गावातील नागरिक एकत्र आले. या उपक्रमात केवळ पुरुषच नव्हे, तर महिला आणि युवकांनीही अत्यंत उत्साहाने व हिरीरीने सहभाग घेतला.भल्या पहाटेपासूनच सर्व ग्रामस्थ हातात फावडी,घमेली घेऊन कामाला लागले होते. महिलांचा आणि तरुणांचा अभूतपूर्व उत्साह पाहून संपूर्ण गावात एकीचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या उपक्रमासाठी माजी सरपंच संदीप मांडवकर,विस्तार अधिकारी भरत भुसारे,यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य,रुखी ग्रामस्थ मंडळाचे सर्व पदाधिकारी,युवा वर्ग, महिला वर्ग यांनी सहकार्य व मार्गदर्शन केले.लोकसहभागातून आणि योग्य नियोजनातून कठीण वाटणारे कामही कसे शक्य होते, याचा एक नवा आदर्श रुखी ग्रामस्थांनी परिसरासमोर ठेवला आहे.
”पाणी हेच जीवन आहे आणि येणाऱ्या काळात आपल्या गावाला पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला. ‘एक दिवस गावासाठी’ या आवाहनाला प्रतिसाद देत महिला व युवकांनी दिलेले योगदान अत्यंत कौतुकास्पद आहे.
ग्रामस्थांनी स्वतःच्या मेहनतीतून उभारलेले हे १२ बंधारे येत्या उन्हाळ्यात परिसरातील विहिरी व विंधनविहिरी पाणीपातळी टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. रुखी ग्रामस्थांच्या या एकत्र येऊन केलेल्या श्रमदानाचे आणि जलसंधारणाच्या या कार्याचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.
