चिपळूण : शहरातील वाशिष्ठी नदी तीरावरील वांगडे मोहल्ला परिसरासाठी अखेर दिलासा देणारा निर्णय झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पूराच्या विळख्यात सापडलेल्या या भागाला आता संरक्षणाचे भक्कम कवच मिळणार आहे. तब्बल रु. २४ कोटी ९९ लाख निधीसह पूर संरक्षक भिंत बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बहादुरशेख पुलापासून वांगडे मोहल्ला पर्यंतचा हा परिसर वाशिष्ठी नदीच्या काठावर वसलेला असून येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. विशेषतः दि. २२ व २३ जुलै २०२१ च्या भीषण पुरात या भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. घरांचे, मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आणि नागरिकांना आर्थिक फटका बसला. नदीच्या पात्राची जास्त रुंदी आणि पाण्याचा वेग यामुळे काठालगतची जमीन सतत खचत असून घरांना धोका निर्माण झाला होता. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी मागील तीन वर्षे सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला.

नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत केलेल्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. क्षेत्रीय कार्यालयाने प्रत्यक्ष पाहणी करून तयार केलेल्या अंदाजपत्रकास शासनाने मंजुरी दिली असून, हा प्रकल्प कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांच्या अंतर्गत राबविण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत अप्पर मुख्य सचिव (जलसंपदा) दीपक कपूर, मुख्य अभियंता कपोले साहेब, तसेच कार्यकारी अभियंता गणेश सलगर आणि त्यांच्या संपूर्ण तांत्रिक पथकाने मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच अंदाजपत्रकाची अचूक मांडणी होऊन प्रकल्पाला गती मिळाली.

ही केवळ सुरुवात असून, पहिल्या टप्प्यातील या कामानंतर पेठमाप स्मशानभूमी ते होळी कट्टा तसेच फरशी पूल ते होळी कट्टा या भागांतील पूर संरक्षक भिंतींसाठीही जून-जुलैमध्ये मंजुरी मिळविण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. “बोले तैसा चाले, त्याची वंदावे पावले” याची प्रचिती देणारे काम आमदार शेखर निकम करत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. पूरमुक्त चिपळूणच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

या कामस प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाल्याने मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री उदय सामंत, तसेच जलसंपदा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आमदार शेखर निकम विशेष आभार व्यक्त केले आहेत. व सदैव चिपळूण पुरमुक्ती साठी पाठीशी असणारे दिवंगत आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना त्रिवार अभिवादन केले आहे. वर्षानुवर्षे भीतीत जगणाऱ्या वाशिष्ठी काठावरील नागरिकांसाठी आता आशेचा किरण उजळला आहे… हा फक्त भिंतीचा प्रकल्प नाही, तर सुरक्षित भविष्याचा भक्कम पाया आहे!