पुणे : राज्यातील शेतकरी आज अत्यंत भीषण दुष्काळात होरपळत असताना राज्य सरकारने जाहीर केलेली 5,000 रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे. केंद्राच्या योजनेप्रमाणे राज्य सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ अंतर्गत वर्षाला 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेचा शेवटचा हप्ता 13 जानेवारी 2026 रोजी खात्यात जमा झाला. त्यानंतर चालू आर्थिक वर्षात मिळायला हवे असलेले आधीचे 4,000 रुपये सरकारने अद्याप दिलेले नाहीत.आधीचे हक्काचे 4,000 रुपये बुडवायचे,हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे,असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की,आदरणीय शरद पवार साहेबांनी पत्रात मांडल्याप्रमाणे शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 1 लाख रुपयांची थेट भरपाई मिळाली पाहिजे,तातडीने आधीचे 4,000 आणि हे 5,000 असे किमान 9,000 रुपये खात्यात जमा झाले पाहिजेत,एकीकडे शेतकऱ्यांना मदत करायला तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे मंत्र्यांसाठी 18 कोटी रुपयांच्या नव्या अलिशान गाड्यांची खरेदी सुरू आहे, असे सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,माझ्या स्वतःच्या बारामती लोकसभा मतदारसंघात 25 लाख मतदार होते, त्यातील तब्बल 7 लाख मतदार अचानक कमी होऊन आता संख्या 19 लाखांवर आली आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात 5 लाख मतदार होते, ते थेट 2.5 लाखांवर आले. आधी 50,000 मतदार वाढवले आणि नंतर 2.5 लाख मतदार कमी केले. हे गायब झालेले मतदार नेमके कोण आहेत? याची माहिती निवडणूक आयोग का लपवत आहे? असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले आहे.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,मी बारामतीमधून निवडून आले आहे, तरीही मी म्हणते की माझी स्वतःची आणि माझ्या मतदारसंघाची चौकशी करा. आम्हाला कॉपी करून पास व्हायचे नाही, तर कष्ट करून जिंकायचे आहे,अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आपण सर्वांनी मिळून मंजूर केला आहे. कॅबिनेटमधील मंत्री जर उघडपणे अशी अंधश्रद्धा पसरवत असतील, तर तो कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा मंत्र्यांना सोयीनुसार राजकीय ‘वॉशिंग मशीन’मध्ये न धुता त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, असेही सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना म्हटले आहे.

पुढे बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,शांततेच्या मार्गाने आणि संविधानाच्या चौकटीत राहून कोणीही आंदोलन करत असेल, तर इंडिया आघाडी आणि आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे,देशात इंटेलिजन्स ब्युरो, गृह मंत्रालय आणि बँकिंग यंत्रणा काय झोपा काढत आहेत का? मी स्वतः संसदेच्या एफसीआरए संयुक्त संसदीय समितीची सदस्य आहे. याच एफसीआरए यंत्रणेत गैरप्रकार केल्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्वतःच्याच 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले होते, हे सत्य देशासमोर आहे,असे सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या.

यावर सविस्तर बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,आमच्या कुटुंबातील अत्यंत कर्ता पुरुष आणि आमचे बंधू गेल्याने आमच्या संपूर्ण पवार कुटुंबामध्ये यंदा कोणतीही दिवाळी साजरी होणार नाही. मुलांची पहिलीच दिवाळी असली तरी आम्ही कोणताही सण साजरा करणार नाही,एका बाजूला आमचे वैयक्तिक मोठे नुकसान झाले आहे, तर दुसऱ्या बाजूला ज्या मायबाप जनतेमुळे आम्ही आहोत, तो शेतकरी आणि कष्टकरी आज दुष्काळ व महागाईच्या आगीत होरपळत आहे. त्यामुळे यंदा बारामतीमध्ये कसलाही राजकीय पाडवा किंवा दिवाळी साजरी केली जाणार नाही,असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.