नागपूर : अनुवंशिक परंपरेने धोबी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना बदलत्या यांत्रिक युगात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वबळावर उभे राहता यावे, उत्पादन व उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने भाजपा उद्योग आघाडीच्या वतीने ‘देवाभाऊ रजक’ योजनेअंतर्गत स्टीम आयर्निंग टेबलचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय संकल्पनेनुसार विकास समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्याचे समाधान मिळते, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांच्या संकल्पनेतून धोबी व्यवसायाला आधुनिकतेची जोड देण्यासाठी ‘देवाभाऊ रजक’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नागपूर येथील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील २० धोबी बांधवांना स्टीम आयर्निंग टेबलचे वितरण करण्यात आले.
२२ जून रोजी प्रतापनगर चौक येथील नक्षत्र सभागृहात सकाळी ९ वाजता झालेल्या या कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनीही भेट दिली.