वेंगुर्ला:- वेंगुर्ला नगरपरिषद आदर्श नगरपरिषद म्हणून काम करीत असून, पारदर्शक कारभारातून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेले “नमो उद्यान” हे जिल्ह्यातील उत्कृष्ट प्रकल्पांपैकी एक असून, यामुळे वेंगुर्ल्याच्या पर्यटन विकासाला नवी चालना मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी (4 सप्टेंबर ) वेंगुर्ला येथे बोलताना केले.
वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील नव्याने जलद गतीने विकसित करण्यात आलेल्या भटवाडी येथील नमो उद्यानाचे उद्घाटन मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे
यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आ. दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी ,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,
नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर,प्रांताधिकारी, तहसीलदार ओंकार ओतारी, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ,शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजपा तालुकाध्यक्ष विष्णु उर्फ पप्पू परब, उपसभापती सचिन देसाई शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी,नगरपरिषद समिती सभापती, उपसभापती नगरसेवक, नगरसेविका तसेच नागरिक
यांच्यासह नगरपरिषद पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, वेंगुर्ला तालुक्यात पर्यटन क्षेत्र वेगाने विस्तारत आहे. चिपी विमानतळामुळे पर्यटकांचे आगमन वाढत असून, जिल्ह्यात होत असलेल्या दर्जेदार विकासकामांमुळे पर्यटकांची गर्दी वाढत आहे. शिरोडा येथे उभारण्यात येणारे ताज हॉटेल हे या तालुक्यातील पर्यटन विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे वेंगुर्ल्यात येणारा पर्यटक अधिकाधिक काळ येथे कसा थांबेल आणि त्याला येथील पर्यटनाचा उत्तम अनुभव कसा मिळेल, यासाठी पर्यटनपूरक वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंधुरत्न योजनेतून जिल्ह्याच्या विकासासाठी 200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, जिल्ह्यात विविध नावीन्यपूर्ण योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. विकासाच्या नव्या संकल्पना राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध राज्यांचे अभ्यास दौरे करावेत. चांगले व नावीन्यपूर्ण प्रस्ताव सादर केल्यास आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नमो उद्यानामध्ये नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना करताना पालकमंत्र्यांनी सांगितले की, उद्यानासाठी पार्किंगसह आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात. तसेच उद्यानाची नियमित व दर्जेदार देखभाल करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी. नगरपरिषदेने विकासकामांसाठी चांगले प्रस्ताव तयार करून सादर करावेत, आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या योजनेतून वेंगुर्ला नगरपरिषदेस नमो उद्यान विकासासाठी एक कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार वेंगुर्ला भटवाडी येथील नगरपरिषद मालकीच्या जागेवर हे उद्यान विकसित करण्यात आले आहे. उद्यानात नागरिक व पर्यटकांसाठी आकर्षक प्रवेशद्वार, बैठकीची व्यवस्था, योग व व्यायामासाठी जागा, लहान मुलांसाठी खेळण्याची सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी, आकर्षक प्रकाश व्यवस्था, वृक्ष व फुलझाडांची लागवड तसेच सेल्फी पॉइंट अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून सोलर बेंच व पावसाचे पाणी साठविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी 20 लाख रुपयांच्या निधीतून गोल होड्या अर्थात कोरॅकल बोटीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक नगरपंचायतीस एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, या माध्यमातून विविध ठिकाणी दर्जेदार नमो उद्याने विकसित होत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नगराध्यक्षांनी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या विविध विकासकामांची माहिती दिली. कार्यक्रमात नमो उद्यानाचे दर्जेदार काम केल्याबद्दल संबंधित कंत्राटदारांचा सन्मान करण्यात आला. तसेच उद्यानातील आकर्षक कमान व शिल्प तयार करणाऱ्या शिल्पकारांचाही गौरव करण्यात आला. उत्कृष्ट कामगिरीबद्दल नगरपरिषदेच्या अभियंता पथकाचाही सन्मान करण्यात आला.