दापोली : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावित प्रक्रियेविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) दापोलीच्या वतीने आज (दि. २४ जुलै) डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके, दापोली तालुका अध्यक्ष राहुल जाधव आणि तालुका सचिव दिनेश रूके यांनी केले. आंदोलनात आंबेडकरवादी कार्यकर्ते, विविध सामाजिक व धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी, संविधानप्रेमी नागरिक तसेच उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या विविध समाजघटकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
यावेळी राहुल जाधव यांनी शासनाने बदर समितीच्या अहवालाच्या आधारे अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न हा संविधानाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात असल्याचा आरोप केला. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमध्ये फूट पडून त्यांच्या घटनात्मक हक्कांवर गदा येईल, असे त्यांनी सांगितले. दिनेश रूके यांनी शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला. तसेच दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा देखील यावी तीव्र निषेध करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांवर लाटी हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. या मोर्चाला जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके यांनी संबोधित केले.
आंदोलनानंतर शासनाच्या नावाने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार अर्चना बोंबे यांच्याकडे प्रशासनाकरिता सादर करण्यात आले. पोलिस बंदोबस्तात हे आंदोलन शांततेत पार पडले.
