चिपळूण : सोनगाव ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) उपप्रादेशिक कार्यालयावर २७ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित केलेल्या धडक मोर्चाला कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे.

समितीतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोनगाव परिसरातील प्रदूषण, दूषित पाणी, पर्यावरणीय हानी तसेच शेती आणि नागरिकांच्या आरोग्यावर होत असलेल्या गंभीर परिणामांकडे संबंधित यंत्रणांचे वारंवार लक्ष वेधूनही प्रभावी कारवाई झालेली नाही. केवळ कागदोपत्री नोटिसा देऊन जबाबदारी पूर्ण झाल्याचे दाखविण्याऐवजी, पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या दोषी उद्योगांवर कायद्यानुसार कठोर आणि प्रत्यक्ष कारवाई होणे आवश्यक आहे.

पर्यावरण संरक्षण हा केवळ सोनगावचा नव्हे, तर संपूर्ण कोकणातील जनतेच्या अस्तित्वाशी निगडित प्रश्न असल्याचे समितीने म्हटले आहे. स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि प्रदूषणमुक्त परिसर हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून, या जनआंदोलनाला व्यापक लोकसमर्थन मिळणे आवश्यक असल्याचेही समितीने स्पष्ट केले.

कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीने सर्व पर्यावरणप्रेमी नागरिक, शेतकरी, सामाजिक संस्था, युवक तसेच विविध संघटनांना या शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाच्या लढ्याला बळ देण्याचे आवाहन केले आहे.

“प्रदूषणमुक्त, निसर्गसंपन्न आणि सुरक्षित कोकण” या उद्दिष्टासाठी हा लढा असून, पर्यावरण रक्षणासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी समितीने केली आहे. समितीचे मार्गदर्शक तथा माजी मंत्री हुसेन दलवाई यांनीही या मोर्चाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

अशी माहिती भरत लब्धे, समन्वयक, कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समिती यांनी दिली.