लांजा : अंगणवाडीत जात असलेल्या चार वर्षीय चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला करून तिला चावा घेतल्याची धक्कादायक घटना लांजा येथे घडली. या हल्ल्यात संभवी समीर तानवडे (वय ४ वर्षे) ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

नागरिकांनी प्रसंगावधान राखत मुलीची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला करणाऱ्या भटक्या कुत्र्यांची संख्या दहा ते बारा होती. कुत्र्यांनी मुलीला शरीराच्या चार ठिकाणी चावा घेतला असून तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.