सोनगाव : सोनगाव येथील ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम असून, उद्या (दि. २७) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) कार्यालयावर संपूर्ण ताकदीने मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात असून, संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधून घेण्यासाठी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील ‘ए’ संपातून दि. ७ जुलै रोजी झालेल्या कथित प्रदूषणाच्या घटनेनंतर सोनगावातील ग्रामस्थ आक्रमक झाले होते. त्यानंतर त्यांनी एमआयडीसीच्या ‘ए’ संपावर धडक देत एमपीसीबी, एमआयडीसी आणि सीईटीपीच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून वस्तुस्थिती दाखवून दिली होती. तसेच संबंधित कारखान्यांवर तातडीने कारवाई करण्याची आग्रही मागणीही केली होती.

मात्र, या घटनेला १९ दिवस उलटूनही कोणत्याही कारखान्यावर ठोस कारवाई झालेली नाही. ही कारवाई केवळ कागदोपत्रीच राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान, नदीतील प्रदूषित पाण्याचे नमुने एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी घेतले होते. मात्र, त्या नमुन्यांचा अहवाल अद्याप ग्रामस्थांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे आम्ही आमच्या मोर्चाच्या निर्णयावर ठाम असून, न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.