चिपळूण (शैलेश जाधव) : इतिहासात प्रथमच वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या कार्यकारिणीची निवडणूक बॅलेट पेपरद्वारे होत आहे. या निवडणुकीत प्रदेशाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून आपण रिंगणात असून, या पदावर विजयी झाल्यास अकोल्यात यशस्वी ठरलेला सत्तेचा अकोला पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल. सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या केंद्रस्थानी आणून वंचित पक्षाला नवसंजीवनी देण्याचा संकल्प असून, त्यासाठी भरघोस मताधिक्याने मला निवडून द्याव्ो, असे आवाहन प्रदेशाध्यक्षपदाचे उमेदवार तथा अकोला पॅटर्नचे शिलेदार राजेंद्र पातोडे यांनी चिपळूण येथे केले.
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारिणी निवडणुकीची प्रक्रिया आणि पक्षाची भूमिका कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राजेंद्र पातोडे चिपळूण दौऱ्यावर आले होते. शहरातील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. पातोडे पुढे म्हणाले की, सध्याच्या राजकीय परिस्थितीत कोणताही एक घटक स्वबळावर सत्ता मिळवू शकत नाही. त्यामुळे बहुजन समाजाने सत्तेसाठी एकजुटीने वाटचाल करण्याची गरज आहे. वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अकोल्यात गेली अनेक वर्षे बहुजनांची मजबूत मोट बांधून सत्ता मिळविण्यात आम्हाला यश आले. हा अकोला पॅटर्न राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. यापूर्वी मला राज्य कार्यकारिणीतील विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. आता प्रदेशाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत असून, पक्षाला सहा महिन्यांत नवसंजीवनी देण्याचा माझा संकल्प केला आहे. विजयी झाल्यानंतर सर्वप्रथम सामान्य कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल. कार्यकर्त्यांना राजकीय पाठबळाबरोबरच निवडणुकांसाठी निधी उभारून आर्थिक सहाय्यही उपलब्ध करून दिले जाईल. तालुका व जिल्हा कार्यकारिणीत महिला आणि युवकांना 25 टक्के प्राधान्य देण्यात येईल. महिला आघाडी स्थापन करून त्यांच्यासाठी स्वतंत्र उपक्रम राबवले जातील. तसेच राज्यभर संवाद दौरे आयोजित करून कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यात पक्षासाठी धावून जाणारा सक्षम कार्यकर्ता उभा करण्याचा निर्धार असून, त्यासाठी कार्यकर्त्यांनी भरघोस मताधिक्याने साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
याव्ोळी प्रदेशाध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र पातोडे (अकोला) यांच्यासह राज्य कार्यकारिणी सदस्यपदाचे उमेदवार नागोराव पांचाळ (परभणी), प्रशांत इंगोले (नांदेड), दीपक डोके (जालना), डॉ. सुरेश शेळके, रायगडचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक मोरे, दक्षिण रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य सुभाष जाधव, सुरेश भिसे, कामगार नेते महेश सावंत, विनोद कदम, महासचिव संदेश कदम, चिपळूण तालुका अध्यक्ष संदीप गमरे, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, संघटक सुधाकर पवार, सल्लागार श्रीधर सकपाळ, सिद्धार्थ सकपाळ, कोषाध्यक्ष अजय गमरे, सचिव विशाल कदम, उद्योजक सूर्यकांत सावंत, संतोष कांबळे, संजय जाधव, दीपक गमरे, रितेश गायकवाड, उत्तर रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष शराफाज मुजावर, उत्तर रत्नागिरी जिल्हा संघटक बाळाराम घाटे, खेड तालुका सरचिटणीस सूर्यकांत लांबे, किरण तायडे, राकेश मोहिते, बाळाराम गमरे, युवा कार्यकर्ते सुमित जाधव, आकाश कांबळे, प्रसन्न मोहिते यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.