दापोली : खेड-दापोली मार्गावरील महाळुंगे येथे झालेल्या दुचाकी अपघातात २२ वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनी सेजल भागवत हिचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिची मैत्रीण वैष्णवी चंद्रकांत अहिरे गंभीर जखमी झाली आहे. या अपघाती दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सेजल भागवत आणि वैष्णवी अहिरे यांनी २५ जुलै रोजी नर्सिंग अभ्यासक्रमाचा शेवटचा पेपर दिल्यानंतर दुचाकीवरून घरी परतण्यास सुरुवात केली होती. महाळुंगे परिसरात त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळले. या अपघातात सेजल भागवत हिला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. वैष्णवी अहिरे हिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघाताची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. नर्सिंगचे शिक्षण पूर्ण करून सेवाक्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सेजल भागवतच्या अकाली अपघाती मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर मित्रपरिवार शोकसागरात बुडाला आहे.