लोटे : लोटे औद्योगिक वसाहतीतील वादग्रस्त लक्ष्मी ऑरगॅनिक कारखान्याविरोधात गेले १३५ दिवस सुरू असलेल्या धरणे आंदोलनाची अखेर प्रशासनाकडून दखल घेण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची आंदोलनकर्त्यांनी भेट घेऊन आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली होती. त्यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून सदर प्रकरणी लक्ष देऊन मला अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या होत्या. त्याचाच परिणाम म्हणून १३५ दिवसांनी का होईना, प्रशासनाने या धरणे आंदोलनाची दखल घेतली आणि आंदोलनाचे कारण व भूमिका जाणून घेतली.

लोटे औद्योगिक वसाहतीतील पी-फॉस रसायनाची निर्मिती करणाऱ्या लक्ष्मी ऑरगॅनिक या कारखान्याविरोधात लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती, कोकण नागरी संघर्ष समिती, अखिल दाभोळखाडी भोई समाज संघटना आणि पंचक्रोशीतील अकरा ग्रामपंचायती यांनी धरणे आंदोलन उभे केले असून, पर्यावरण आणि मानवी जीवनाचा नाश करणारे पी-फॉस रसायन तयार करणारा हा कारखाना बंद झालाच पाहिजे, अशी मागणी लावून धरली आहे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी, दोन्ही विधानसभा मतदारसंघांचे आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री व उद्योगमंत्री यांपैकी कोणीही या आंदोलनाची दखल घेतली नाही. इतकेच काय, तर १३५ दिवस सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल प्रशासनाकडूनही घेण्यात आली नाही.

अशातच दिनांक २९ मे रोजी आंदोलनकर्त्यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन पी-फॉस रसायनाची निर्मिती करणाऱ्या या कारखान्याविरोधातील आंदोलनामागील भूमिका स्पष्ट केली. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या उदासीन धोरणाबाबतही त्यांना माहिती दिली. त्यावेळी त्यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून सदर प्रकरणाची सखोल माहिती घेऊन अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या. सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ आणि प्रशासन यांची मंत्रालयात बैठक घेऊ, असे आश्वासन त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.

याचाच परिणाम म्हणून काल, दिनांक ४ जून रोजी खेडच्या उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील आणि तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी धरणे आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. तसेच सदर बैठकीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार असून पुढील निर्णय जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणा घेतील, असे त्यांनी सांगितले. प्रशासनाचे योग्य असेल त्या ठिकाणी आंदोलनाला सहकार्य राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने अशोक जाधव, राजेंद्र आंब्रे, उदय घाग, कांचन चाळके, भालचंद्र पटवर्धन, मंगेश चाळके, रवींद्र गोवळकर, शंतनू रेडीज यांच्यासह अन्य धरणे आंदोलनकर्ते उपस्थित होते.