खेड (प्रतिनिधी) : उत्तर रत्नागिरीत आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलत योगिता दंत महाविद्यालय व दवाखान्यात अत्याधुनिक सीबीसीटी (Cone Beam Computed Tomography) इमेजिंग मशीनचे उद्घाटन शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या अध्यक्षा ज्योती रामदास कदम व प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश रामदास कदम यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली ही सुविधा कोकणातील रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे।

या आधुनिक यंत्रणेमुळे दात, जबडा आणि चेहऱ्याच्या हाडांचे अचूक व त्रिमितीय (थ्री-डी) निदान करणे शक्य होणार असून, इम्प्लांट, रूट कॅनल, ऑर्थोडॉन्टिक उपचार तसेच जटिल शस्त्रक्रियांसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कमी वेळेत अचूक अहवाल उपलब्ध होत असल्याने उपचार अधिक जलद आणि प्रभावीपणे करता येणार आहेत. या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत मान्यवर, डॉक्टर, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष म्हणजे, यापूर्वी अशा प्रकारच्या तपासणीसाठी रुग्णांना मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रवास करावा लागत होता. मात्र, आता ही अत्याधुनिक सुविधा उत्तर रत्नागिरीत उपलब्ध झाल्याने रुग्णांचा वेळ आणि खर्च दोन्हींची मोठी बचत होणार आहे. या युनिटमुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळणार असून संशोधन आणि शैक्षणिक प्रगतीलाही चालना मिळणार आहे. ग्रामीण व कोकणातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.