चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या मिशन फिनिक्स मोहिमेंतर्गत चिपळूण पोलिसांनी मोठी कारवाई करत 530 ग्रॅम वजनाचा सुमारे 30 हजार रुपये किमतीचा गांजासदृश अमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार 31 जुलै रोजी पथक हद्दीत गस्त घालत असताना वालोपे येथील रेल्वे स्थानकासमोरील साई मंदिराजवळ एक व्यक्ती हातात पिशवी घेऊन संशयास्पद हालचाली करताना आढळली. त्यास दोन पंचांसमक्ष थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव अब्दुल गफ्फार हमीद म्हालदार (वय 48, रा. चिवेली मोहल्ला, ता. चिपळूण) असे सांगितले.
यानंतर पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीमध्ये त्याच्या ताब्यातील कापडी पिशवीतील प्लास्टिकच्या पिशवीत 530 ग्रॅम वजनाचा गांजासदृश अमली पदार्थ आढळून आला. हा पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचा संशय असल्याने पोलिसांनी तो जप्त करून त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक ओम आघाव, पोलीस हवालदार संदीप माणके, वृषाल शेटकर, रोशन पवार तसेच पोलीस कॉन्स्टेबल शैलेश वनगे व रुपेश जोगी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.