चिपळूण : चिपळूण शहरातील भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटी पद्धतीने पाणी आणण्याच्या सुमारे १५० कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणी योजनेला गती देण्यात येणार आहे. या योजनेसाठी नगरपरिषदेला सुमारे १५ कोटी रुपये भरावे लागणार असून, आर्थिक स्थिती नाजूक असल्याने त्यासाठी शासकीय कर्ज घेण्याचा पर्याय नगरपरिषदेकडून विचाराधीन आहे.
सुमारे १६ किलोमीटर लांबीच्या या योजनेत कोळकेवाडी धरणातील पाणी ७ इंची पाइपलाइनद्वारे ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून चिपळूण शहरात आणण्यात येणार आहे. या योजनेसाठी कोयना सिंचन विभागाकडे कोळकेवाडी धरणात लेक टॅपिंग करण्यासाठी नगरपरिषदेला सुमारे ५.५ कोटी रुपये भरावे लागणार आहेत.
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी उन्हाळ्यात चिपळूण शहरासमोर तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच कोयना धरणातील पाणीसाठाही पुरेसा नसल्याने उन्हाळ्यात शहराला पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागू शकते. त्यामुळे भविष्यातील पाणीप्रश्न लक्षात घेता ग्रॅव्हिटी पाणी योजना होणे अत्यावश्यक बनले आहे.
नगरपरिषदेची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता १५ कोटी रुपयांचा हिस्सा भरणे आव्हानात्मक आहे. त्यामुळे शासकीय कर्जाच्या माध्यमातून हा निधी उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
“चिपळूण शहराच्या भविष्यातील पाणीप्रश्नासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची असून, कोणत्याही परिस्थितीत ती पूर्ण होणे अपेक्षित आहे,” असे मुख्याधिकारी संजय जाधव यांनी सांगितले.