चिपळूण : दीपावलीच्या मंगलमय पर्वात लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी चिपळूण शहरातील व्यापारी बांधवांची भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यापाऱ्यांनीही प्रशांत यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करीत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सुमारे दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या सदिच्छा भेटीदरम्यान प्रशांत यादव यांनी ज्येष्ठ व्यापाऱ्यांचे आशीर्वाद घेत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.

दीपावली हा आनंद, चैतन्य आणि मांगल्याचा सण सध्या सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. या सणातील लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असून, रविवारी सायंकाळी चिपळूण शहरासह परिसरात लक्ष्मीपूजनाचा सोहळा उत्साहात पार पडला. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने चिपळूणच्या बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. व्यापाऱ्यांनीही आपापल्या दुकानांमध्ये लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने साजरा केला. रोषणाईने सजलेली दुकाने, ग्राहकांची वर्दळ आणि व्यापाऱ्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण बाजारपेठेला चैतन्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

याच मंगलमय वातावरणात भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत खेर्डी तसेच चिपळूण बाजारपेठेतील व्यापारी बांधवांच्या भेटी घेतल्या. यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी दुकानाच्या प्रवेशद्वारावर येऊन त्यांचे स्वागत केले. काही व्यापाऱ्यांनी त्यांना आग्रहाने दुकानात नेऊन दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली. व्यापाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या व्यवसायाची विचारपूस केली, तसेच ज्येष्ठ व्यापाऱ्यांचे आशीर्वाद घेतले. या सदिच्छा भेटीदरम्यान चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनीही प्रशांत यादव यांची भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

यावेळी चिपळूणच्या उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर, गटनेते शशिकांत मोदी, नगरसेवक संदीप भिसे, नगरसेवक शुभम पिसे, जिल्हा चिटणीस योगेश शिर्के, स्वानंद रानडे, महिला मोर्चा शहराध्यक्ष रूही खेडेकर, युवा सरचिटणीस कुणाल आंबेकर, पंचायत राज संयोजक नरेंद्र बेलवलकर, अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र तटकरे, राकेश दाते यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या या सदिच्छा भेटीतून व्यापारी बांधवांशी असलेला संवाद आणि सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले. व्यापारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने या भेटीची चर्चा बाजारपेठेत रंगली होती.