चिपळूण : तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेअंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयातील कृषी कार्यानुभव कार्यक्रमाच्या माध्यमातून निवळी (ता. चिपळूण) येथे शेतकऱ्यांसाठी ‘बीज वर्गीकरण’ या विषयावर प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले.
शेतकऱ्यांमध्ये विविध बियाण्यांच्या वर्गांविषयी जनजागृती निर्माण व्हावी तसेच दर्जेदार व प्रमाणित बियाण्याची योग्य ओळख व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना बियाण्याचे विविध वर्ग, त्यांची वैशिष्ट्ये तसेच बियाण्याच्या गुणवत्तेचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बियाण्याचे केंद्रक बीज, प्रजनक बीज, पायाभूत बीज आणि प्रमाणित बीज असे प्रमुख वर्ग असून प्रत्येक वर्गाची निर्मिती व उपयोग वेगवेगळा असतो, याची माहिती देण्यात आली. तसेच योग्य दर्जाचे व प्रमाणित बियाणे वापरल्यास पिकांची उगवण चांगली होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते, असेही स्पष्ट करण्यात आले.
प्रात्यक्षिकादरम्यान विविध बियाण्यांचे नमुने प्रत्यक्ष दाखवून त्यांच्या ओळखीविषयी माहिती देण्यात आली. यामध्ये बियाण्यांच्या विविध वर्गांची माहिती, बियाण्याच्या पिशवीवरील टॅगचा रंग, बियाण्याची शुद्धता, उगवण क्षमता तसेच दर्जेदार बियाणे निवडताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना प्रमाणित बियाण्याची निवड करून पिशवीवरील माहिती व टॅग तपासावा, असे आवाहन करण्यात आले.
हा उपक्रम तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी, बीजशास्त्र विभागाचे प्राध्यापक संदीप काळे तसेच कृषी कार्यानुभव समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषीदूत कु. देवयानी गुरव, दीक्षा कांबळे, गौरी भंडगर, क्रांती देवकर, तेजल भिंगारदेवे, सुप्रिया धामणीकर, नम्रता अहिरे, सुहानी घाडगे, समीक्षा सोरदे यांनी विशेष परिश्रम घेतले असून शेतकरी बंधूंनी त्यांचे आभार मानले.