चिपळूण : तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेअंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयातील कृषी कार्यानुभव कार्यक्रमाच्या माध्यमातून निवळी (ता. चिपळूण) येथे शेतकऱ्यांसाठी ‘बोर्डो पेस्ट’ या विषयावर प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले.
शेतकऱ्यांमध्ये बोर्डो पेस्टच्या योग्य वापराविषयी जनजागृती निर्माण व्हावी तसेच पिकांचे विविध बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी बोर्डो पेस्टचा योग्य प्रकारे वापर करता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना बोर्डो पेस्टची निर्मिती, त्यातील घटक तसेच पिकांच्या रोग व्यवस्थापनामध्ये त्याचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बोर्डो पेस्ट तयार करण्यासाठी कॉपर सल्फेट, चुना व पाणी यांचा योग्य प्रमाणात वापर केला जातो. झाडांच्या खोडावर व फांद्यांवर बोर्डो पेस्ट लावल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते, अशी माहिती देण्यात आली. तसेच बोर्डो पेस्टचा योग्य वेळी व योग्य पद्धतीने वापर केल्यास पिकांचे संरक्षण होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते, असेही स्पष्ट करण्यात आले.
प्रात्यक्षिकादरम्यान बोर्डो पेस्ट तयार करण्याची पद्धत प्रत्यक्ष दाखवून तिच्या वापराविषयी माहिती देण्यात आली. यामध्ये कॉपर सल्फेट व चुना योग्य प्रमाणात मिसळणे, पेस्ट तयार करताना घ्यावयाची काळजी तसेच झाडांच्या खोडावर बोर्डो पेस्ट लावण्याची योग्य पद्धत याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी बोर्डो पेस्ट तयार करताना योग्य प्रमाणाचा वापर करून आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
हा उपक्रम तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी, वनस्पती रोगशास्त्र विभागाचे प्राध्यापक सुर्यवंशी सर तसेच कृषी कार्यानुभव समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषीदूत कु. देवयानी गुरव, दीक्षा कांबळे, गौरी भंडगर, क्रांती देवकर, तेजल भिंगारदेवे, सुप्रिया धामणीकर, नम्रता अहिरे, सुहानी घाडगे, समीक्षा सोरदे यांनी विशेष परिश्रम घेतले असून शेतकरी बंधूंनी त्यांचे आभार मानले.