दापोली :- संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूल, दापोलीच्या इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (केकेवी), दापोली येथे शैक्षणिक क्षेत्रभेट उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांना शेतीविषयक ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून मिळावे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि कृषी क्षेत्राविषयी आवड निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी भात लागवडीतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या भात लावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शेतात उतरून भाताची लावणी करताना त्यांनी शेतीतील कष्ट, शिस्त, कौशल्य आणि शेतकऱ्यांचे मोलाचे योगदान जवळून अनुभवले. तसेच विद्यापीठातील विविध कृषी संशोधन प्रकल्प, आधुनिक शेती पद्धती, सुधारित बियाणे, कृषी क्षेत्रातील नवतंत्रज्ञान आणि संशोधनाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. कोकण कृषी विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अल्पोपाहाराचीही व्यवस्था करण्यात आली.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. संजय भावे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत कृषी शिक्षणाचे महत्त्व, आधुनिक शेतीतील संशोधन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि पर्यावरण संवर्धनाची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कृषी शिक्षणाबाबत उत्सुकता निर्माण झाली.
शाळेच्या मुख्याध्यापिका चंदाली पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आला. या क्षेत्रभेटीस शिक्षक शैलेश शिंदे, सई शिगवण, नंदिनी लेंडे , नुरेन वाकणकर आणि हे उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संपूर्ण उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
ज्ञान, अनुभव आणि प्रत्यक्ष कृती यांचा सुंदर संगम घडवून आणणारी ही शैक्षणिक क्षेत्रभेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरली.