दापोली : पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी लायन्स क्लब दापोलीच्या वतीने जॉली क्लब, दापोली येथे वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमाचे प्रोजेक्ट हेड लायन केतन वनकर यांनी उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.
कार्यक्रमात लायन्स क्लब दापोलीचे अध्यक्ष तथा कृषी पदवीधर लायन गुरुप्रसाद बेर्डे यांनी स्थानिक हवामान, पर्जन्यमान आणि भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करून कमी पाण्यातही सहज तग धरणाऱ्या तसेच पर्यावरणासाठी उपयुक्त अशा देशी वृक्षांच्या लागवडीवर विशेष भर दिला. पर्यावरणाचा समतोल राखणे, जैवविविधतेचे संवर्धन करणे आणि भावी पिढ्यांसाठी आज लावलेले वृक्ष उद्याच्या पिढ्यांसाठी हरित श्वास आहेत,हरित वारसा निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जांभूळ, आपटा, वड, पिंपळ आणि सप्तपर्णी या पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या वृक्षांसह फळझाडे व सावलीची झाडे मोठ्या प्रमाणावर लावण्यात आली. या वृक्षांमुळे भविष्यात परिसराचे हरित सौंदर्य वाढण्याबरोबरच पक्षी व इतर जीवसृष्टीला नैसर्गिक अधिवास उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
उपस्थितांनी केवळ वृक्षारोपण न करता प्रत्येक वृक्षाचे संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली. वृक्ष लावण्याइतकेच त्यांचे संरक्षण व संगोपन महत्त्वाचे असून, लावलेले प्रत्येक झाड जगविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या उपक्रमाला जॉली क्लब दापोलीचे सदस्य तसेच लायन्स क्लब दापोलीचे लायन श्रीराम माजलेकर, प्रमोद तलाठी, आशिष मेहता, मनोहर जैन, महेंद्र जैन, महेश पटोलिया, अतुल मेहता, सचिव लायन आशिष अमृते, खजिनदार लायन फजल लखांगे, सुजय मेहता, झोन चेअरमन निलेश हेदुकर उपस्थित होते. उपस्थित सर्व सदस्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याचा संकल्प केला.