दापोली:- दापोली–हर्णे पाजपंढरी मार्गाची अत्यंत दुरवस्था झाल्याने वाहनचालक, प्रवासी व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जहरू उद्देशिया कोंडविलकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दापोली–हर्णे पाजपंढरी मार्ग हा तालुक्यातील महत्त्वाचा संपर्क मार्ग असून या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक, विद्यार्थी, रुग्ण तसेच पर्यटक प्रवास करतात. मात्र, रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने वाहन चालविणे धोकादायक बनले आहे.
निवेदनानुसार, रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी डांबरीकरण पूर्णपणे उखडले आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना विशेषतः मोठा धोका निर्माण झाला असून अनेक लहान-मोठे अपघात घडत आहेत. स्वतः निवेदनकर्ते देखील या मार्गावर दोन वेळा अपघातग्रस्त झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. भविष्यात एखादा गंभीर अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रुग्णवाहिका, शालेय वाहने तसेच दैनंदिन प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याची खंतही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर दापोली–हर्णे पाजपंढरी मार्गावरील सर्व खड्डे तात्काळ बुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, तसेच भविष्यात कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा प्रवासी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता (चिपळूण) तसेच दापोली पोलीस निरीक्षक यांनाही पाठविण्यात आल्या असून, रस्त्याच्या दुरवस्थेची छायाचित्रेही निवेदनासोबत जोडण्यात आली आहेत. नागरिकांनीही या मार्गाची तातडीने दुरुस्ती करून अपघातांना आळा घालण्याची मागणी केली आहे.