मुंबई : बिहारमधली एक पोटनिवडणूक जिंकल्यानंतर संजय राऊत देशभर पेढे वाटत हा आपला विजय असल्याचे सांगत आहेत. संजय राऊत, तुम्ही ज्या काँग्रेसची गुलामी करता त्या काँग्रेसचा आणि तुम्ही ज्या राजदसोबत आहात त्यांचाही पराभव झाला आहे. उबाठा गटाला गेल्या चार-पाच वर्षांत सेलिब्रेशन करायची संधी मिळाली नाही. तुम्ही आणि तुमचा पक्ष वांझोटा राहतोय ते पहा. बिहारपेक्षा महाराष्ट्रात आपल्या पक्षाची अवस्था काय झाली त्याकडे लक्ष दिले असते तर तुम्हाला बिहारचे सेलिब्रेशन करावे लागले नसते, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते समीर बाकरे उपस्थित होते.
बिहारमध्ये भाजपाचा पराभव झालेला नाही. भाजपाचा पराभव होत नाही. एकतर भाजपा जिंकते किंवा शिकते. आता बिहारमधील निवडणुकीच्या निकालातून शिकू आणि आम्ही पुन्हा एकदा पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागू. एका निवडणुकीच्या पराभवामुळे नरेंद्र मोदीजींचा पराभव झाला, भाजपाला लोक स्वीकारत नाहीत, हे निकष लागत असतील तर गुजरातच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय झाला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातल्या सर्वच निवडणुकांमध्ये उद्धवजी ठाकरे यांचे अस्तित्वही शिल्लक राहिलेले नाही. मग याचा अर्थ उबाठा गट पूर्णपणे लयाला गेला, असा होतो. उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष पूर्णपणे संपला, हे संजय राऊत यांनी मान्य करावे, असे श्री. बन म्हणाले.
श्री. बन पुढे म्हणाले, खरी शिवसेना ही एकनाथजी शिंदे यांची आहे, हे महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा, लोकसभा आणि महापालिकेच्या निवडणुकांमध्ये सांगितले आहे. आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर जो निकाल यायचा तो येईल. पण जनतेच्या न्यायालयात एकनाथजी शिंदे यांचीच शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. हिंदुत्ववाद्यांची शिवसेना ही एकनाथजी शिंदे यांचीच आहे, यावर जनतेने शिक्कामोर्तब केलं आहे. संजय राऊतांचा उबाठा गट हा काँग्रेसचे लुगडे धुणारा, सोनिया गांधींची गुलामी करणारा आणि राहुल गांधींची चाकरी करणारा गट आहे, हेही महाराष्ट्राने ओळखले आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत रोहित पवार हे काठावर पास झाले होते. आता ते अभ्यासक्रमातही काठावर पास झालेत का? असा सवाल करून श्री. बन म्हणाले, एसआयआर प्रक्रियेवर शंका घेण्याआधी अभ्यास करा. निवडणूक आयोगाला जाऊन भेटा.