चिपळूण : तालुक्यातील मिरजोळी येथील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल व डी.बी.जे. कॉलेज परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांबत नसल्याचा प्रश्न शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेनेने लावून धरल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तातडीने दखल घेत मिरजोळी बसस्टॉपवर विशेष कर्मचारी नियुक्त केला आहे. त्यानंतर या ठिकाणी एसटी बस नियमितपणे थांबू लागल्याने विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मिरजोळी बसस्टॉपवर हात दाखवूनही चिपळूण-गुहागर मार्गावरील एसटी बस विद्यार्थ्यांसाठी न थांबल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. याम विद्यार्थ्यांना तब्बल तीन तासांहून अधिक काळ उन्हात उभे राहावे लागल्याने पालक व नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.
या प्रकाराची गंभीर दखल घेत शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चिपळूण एसटी आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मिरजोळी येथील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल व डी.बी.जे. कॉलेज बसस्टॉपवर प्रत्येक एसटी बस नियमित थांबविण्यात यावी, तसेच विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित असा प्रकार पुन्हा घडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
एसटी महामंडळाने तातडीने मिरजोळी बसस्टॉपवर विशेष कर्मचारी नियुक्त करून प्रत्येक बस नियमानुसार थांबत आहे की नाही, यावर देखरेख सुरू केली. या उपाययोजनेमुळे बस नियमित थांबू लागल्याने विद्यार्थ्यांचा प्रवास सुलभ झाला आहे. विद्यार्थ्यांच्या समस्येची तातडीने दखल घेत सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तसेच चिपळूण आगार व्यवस्थापकांचे शिवसेना शहरप्रमुख सचिन (भैया) कदम आणि युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे यांनी आभार मानले आहेत.
शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश; मिरजोळी बसस्टॉपवर एसटी थांबू लागली..
