चिपळूण : कला व साहित्य क्षेत्रातील अखिल भारतीय संस्था ‘संस्कार भारती’च्या उत्तर रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे लहान मुलांना मातीपासून गणपतीची मूर्ती तयार करण्याची ओळख व्हावी, या उद्देशाने ‘चला करूया गणपती’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत संतोष केतकर आणि सुनील खेडेकर हे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी गुरुवार, दि. 13 ऑगस्ट 2026 पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतरही इच्छुकांना सहभागी होता येणार आहे. कार्यशाळेसाठी नाममात्र 200 रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले असून ते प्रशिक्षणाच्या दिवशी स्वीकारण्यात येणार आहे.
कार्यशाळा रविवार, दि. 16 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता सुरू होणार असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रशिक्षण चालणार आहे. सहभागी प्रशिक्षणार्थींना माती पुरविण्यात येणार आहे. मात्र प्रत्येकाने मूर्ती तयार करण्यासाठी आवश्यक पाट, प्लायवूड तसेच हात पुसण्यासाठी कापड सोबत आणावे. जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटलीही आणण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यशाळेच्या पुढील टप्प्यात रविवार, दि. 23 ऑगस्ट रोजी तयार केलेल्या गणेशमूर्तींचे रंगकाम शिकविण्यात येणार आहे. त्यासाठी पोस्टर कलर, रंगकामासाठी आवश्यक साहित्य व ब्रश आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रंगकाम पूर्ण झाल्यानंतर सहभागी आपापली मूर्ती घरी घेऊन जाऊ शकणार आहेत. मूर्ती न नेल्यास तिचे विधिवत विसर्जन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
ही कार्यशाळा योग स्क्वेअर, संध्याचे माधव बाग, बेंदरकर आळी, चिपळूण येथे होणार आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्कार भारती उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष शरद तांबे आणि महामंत्री मंगेश बापट यांनी केले आहे.
संस्कार भारतीतर्फे ‘चला करूया गणपती’ कार्यशाळेचे आयोजनमातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविण्याचे मिळणार प्रशिक्षण….
