रत्नागिरी : रत्नागिरीतील जे. के. फाईल ते रेल्वे स्थानक या मार्गावर किमान ४० ते ५० मोकाट गायी व बैल रस्त्यावर झुंडीने बसत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र, मोकाट जनावरे रस्त्यावरच वावरत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

विशेषतः रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक वाढत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. संबंधित प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रत्नागिरी शहरात मोकाट गुरांचा प्रश्न यापूर्वीही गंभीर बनल्याचे स्थानिक प्रशासनाने मान्य केले असून, त्यामुळे ही समस्या तातडीने सोडविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.