चिपळूण : तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेअंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयातील कृषी कार्यानुभव कार्यक्रमाच्या माध्यमातून निवळी (ता. चिपळूण) येथे शेतकऱ्यांसाठी ‘पनीर निर्मिती’ या विषयावर प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले.
शेतकऱ्यांमध्ये दुधापासून मूल्यवर्धित पदार्थ निर्मितीविषयी जनजागृती निर्माण व्हावी तसेच घरगुती स्तरावर पनीर तयार करून दुग्ध व्यवसायातून अतिरिक्त उत्पन्न मिळविता यावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना पनीर निर्मितीची प्रक्रिया, त्यासाठी लागणारे साहित्य तसेच पनीरचे पोषणमूल्य व आर्थिक महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पनीर तयार करण्यासाठी ताजे दूध व खाद्य आम्लाचा योग्य प्रमाणात वापर केला जातो.
दूध गरम करून त्यामध्ये योग्य प्रमाणात आम्ल मिसळल्यास दुधाचे छेना व पाणी वेगळे होते. त्यानंतर छेना स्वच्छ कापडामध्ये गाळून त्यातील अतिरिक्त पाणी काढून योग्य दाब दिल्यास पनीर तयार होते, अशी माहिती देण्यात आली. तसेच दुधापासून पनीरसारखे मूल्यवर्धित पदार्थ तयार केल्यास दुधाला अधिक बाजारमूल्य मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते, असेही स्पष्ट करण्यात आले.
प्रात्यक्षिकादरम्यान पनीर तयार करण्याची पद्धत प्रत्यक्ष दाखवून त्याच्या निर्मितीविषयी माहिती देण्यात आली. यामध्ये दूध योग्य तापमानापर्यंत गरम करणे, त्यामध्ये आवश्यक प्रमाणात खाद्य आम्ल मिसळणे, तयार झालेला छेना गाळणे, अतिरिक्त पाणी काढणे तसेच पनीरला योग्य आकार देण्याची पद्धत याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. पनीर तयार करताना स्वच्छता राखून दर्जेदार व ताज्या दुधाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.
हा उपक्रम तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. दिव्या कोकणी तसेच कृषी कार्यानुभव समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
