चिपळूण : शहरातील जिल्हा परिषद शाळांसमोर घटती पटसंख्या आणि त्यामुळे निर्माण झालेले अस्तित्वाचे संकट लक्षात घेऊन नगरपालिकेच्या शिक्षण सभापती हर्षाली पवार यांनी शाळा वाचविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. शिक्षण सभापतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी शहरातील शिक्षण व्यवस्थेकडे विशेष लक्ष केंद्रित करत जिल्हा परिषद शाळांना भेटी देऊन प्रत्येक शाळेतील समस्या प्रत्यक्ष जाणून घेत आवश्यक उपाययोजना करण्यासाठी त्या पुढाकार घेत आहेत.
या पाहणी दौऱ्यात शिक्षण समितीचे सदस्य प्रमोद बुरटे, विक्रांत लवेकर, अंजली कदम, संदिप भिसे, वैशाली कदम, मिस्बाह नाखुदा, शैनाज वांगडे, शिक्षण विभाग प्रमुख बापू साडविलकर सहभागी होत आहेत. शाळांमधील पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची संख्या, शैक्षणिक वातावरण आणि विविध अडचणींचा आढावा घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सध्या राज्यभरातील अनेक जिप शाळा पटसंख्येअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. खासगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा वाढता कल, स्थलांतर आणि घटती विद्यार्थी संख्या यामुळे ग्रामीण व शहरी भागातील अनेक शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरातील शाळा टिकून राहाव्यात आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी शिक्षण सभापती हर्षाली पवार यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.
शाळांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, पालकांचा विश्वास वाढविणे आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शिक्षकांचाही या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून शाळांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सर्व स्तरांतून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चौकट
पालकांनी जिल्हा परिषद शाळांकडे वळावे हर्षाली पवार…
सध्या जिप शाळांची पटसंख्या अत्यंत चिंताजनक आहे. विद्यार्थ्यांअभावी शाळा बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. शहरातील सर्वसामान्य मुलांच्या शिक्षणासाठी या शाळा टिकणे अत्यंत गरजेचे आहे. भविष्यात एकही शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडू नये, यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत आहोत. शिक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश दिल्यास या शाळांना आपोआपच नवसंजीवनी मिळेल.
शहरातील जि प शाळा वाचविण्यासाठी शिक्षण सभापती हर्षाली पवार यांची धडपड…
